डॉ.नरेंद्र काळे यांच्या विषयी (सामाजिक व राजकीय कार्य)
नरेंद्र काळे यांचा जीवनप्रवास संघर्षमय आणि धडाडीचा राहिला आहे. 1997 ते 2002 या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यात पुढाकार घेतला होता. त्यावेळी पदवीधर मतदारसंघाचे तत्कालीन आमदार स्व. वसंतराव काळे यांचे सानिध्य लाभले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांना मार्गी लावता आले. याच काळात आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जपत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. पवार साहेबांविषयी लोकांमध्ये आकर्षण वाढू लागले होते. पवार साहेबांपासून प्रेरित होऊनच डॉ. नरेंद्र काळे यांनी महाविद्यालयीन
जीवनातच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून जोमाने कार्य सुरु केले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी सुरू केलेले कार्य आजपर्यंत अव्याहतपणे सुरूच आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे 80 टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे तत्व तंतोतंत पाळणारा व कृतीतून अवलंब करणारा कार्यकर्ता म्हणून आजही डॉ.नरेंद्र काळे यांचा नावलौकिक आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ते प्रदेश उपाध्यक्ष हा संघटनात्मक प्रवास गुणवत्ता, परीश्रम आणि निष्ठेने झालेला आहे.
सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असताना आपल्या शैक्षणिक विकासाकडे मात्र त्यांनी दूर्लक्ष केले नव्हते. समाजसेवेचाच एक भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून लगेच 2002 मध्ये अंबाजोगाई येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसायास सुरुवात केली. अंबाजोगाई शहर मराठवाड्याची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी. या शहरात कर्तृत्व गाजवण्याची त्यांना संधी मिळाली. अंबाजोगाई शहरातील विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत ते आपल्या कार्याचा ठसा उमटवत होते. रोटरी क्लच्या माध्यमातुन सामाजिक कार्यास सुरूवात केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची डॉक्टर्स सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी 2006 मध्ये निवड केली. या पदावर डॉ.नरेंद्र काळेंनी केलेल्या कामाची दखल घेऊन तत्कालीन आरोग्यमंत्री स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांनी जून 2010 मध्ये डॉ. नरेंद्र काळे यांची अंबाजोगाई नगरपरिषदेच्या स्विकृत सदस्यपदी सन्मानाने निवड केली होती. 2010 - 2017 या 8 वर्षाच्या काळात नगरसेवकपदावर कार्यरत राहून त्यांनी सामान्य जनतेचे अनेक प्रश्न मार्गी लावले. सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना मानवलोकचे कार्यवाह स्वर्गीय द्वारकादासजी लोहिया उर्फ बाबूजी यांचेही त्यांना सदैव मार्गदर्शन मिळालेले आहे.
या काळातच बीड जिल्ह्यात स्त्री भ्रूणहत्येची प्रकरणे मोठ्या प्रमाणात बाहेर येत होती. डॉ. नरेंद्र काळे यांनी मानवतेला काळीमा फासणारे असे प्रकार रोखता यावेत, म्हणून जनजागृती करणारे विविध कार्यक्रम राबवले. सोबतच नगरपालिकेमार्फत मुलींचे जन्म प्रमाणपत्र मोफत देण्याचा निर्णय मंजूर करून घेतला. त्यानंतर सामाजिक कार्यासाठी स्व. नारायण दादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक गरीब, होतकरु, वंचित व गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली. त्यांचे हे काम आजही अविरत सुरू आहे.
खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या नामवंत संस्थेच्या बीड जिल्हा केंद्राचे सचिव म्हणून अनेक वर्षापासुन कार्यरत आहेत. या संस्थेच्या वतीने तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागविण्यासाठी दरवर्षी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 'युवा स्वातंत्र्य ज्योत रॅली' चे आयोजन करण्यात येते. या केंद्राच्या माध्यमातून अनेकानेक समाजोपयोगी व विधायक उपक्रम राबवले जातात. अंबाजोगाई परीसराच्या पर्यटन विकासासाठी ही डॉ. नरेंद्र काळे यांनी प्रयत्न केले.
निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे हवालदिवाल झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या
आत्महत्यांचे भीषण सत्र सुरू झाले. या कठीण प्रसंगात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.नरेंद्र काळे यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार,कीर्तनकार शामसुंदर सोन्नर महाराज यांच्या माध्यमातून मराठवाड्यातील ग्रामीण भागामध्ये,विविध गावामध्ये हरिकीर्तन आयोजित केले आणि समाज प्रबोधनातुन शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पुढाकार घेतला.
श्री. बनेश्वर शिक्षण संस्था,बनसारोळा ता.केज जि.बीड सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतर ग्रामीण भागातील बहुजन व मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डॉ. नरेंद्र काळे यांनी विशेष प्रयत्न कले. या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संदर्भातील अनेक उपक्रम ते आजवर राबवत आलेले आहेत. या संस्थेच्या माध्यमातूनच केज व अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागात चार माध्यमिक शाळा व तीन मागासवर्गीय वसतिगृहे चालवली जातात.
कोरोनाने जेव्हा जगाला विळखा घातला होता, तेव्हा डॉ. नरेंद्र काळे यांनी रुग्णांना मदत तर केलीच, शिवाय जनजागृती करण्यासाठीही त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. केज तालुक्यातील बनसारोळा येथे श्री. बनेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने कोविड केअर सेंटर'ची उभारणी करून ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा दिला. त्याचबरोबर राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलच्या माध्यमातून राज्यभर मदत कार्य केले. यामुळेच संकटप्रसंगी थेट जमिनीवर उतरून काम करणारा कार्यकर्ता अशी जनमानसात त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
आपल्या या सामाजिक कार्याच्या बळावर त्यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा प्रचंड यश संपादन केले. पदवीधर, शिक्षक व विद्यापीठीय निवडणुकांत विजय खेचून आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांत सलग दोन टर्म अजिंक्य राहून त्यांनी हजारो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. 'महाराष्ट्र डेन्टल कॉन्सिल' चे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून डॉ. नरेंद्र काळे यांची वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरी लक्षवेधी, दैदिप्यमान व दखलपात्र राहिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून येत पदवीधर व ग्रामीण विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेतच, याशिवाय अंबाजोगाई येथे विद्यापीठाकडूनच 'कौशल्य विकास केंद्र' सुद्धा मंजूर करुन घेतले आहे. यासाठी पंचवीस एकर जमीन मिळून देण्यात डॉ. नरेंद्र काळे यांचा सिंहाचा वाटा आहे. आदरणीय शरद पवार साहेबांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठीचे योगदान लक्षात घेता त्यांना डी. लिट. प्रदान करण्यासाठीचा प्रस्ताव डॉ. नरेंद्र काळे यांनीच विद्यापीठ कार्यकारिणी सभेत व अधिसभेत मांडून मंजूर करून घेतला.
दुष्काळामध्ये होरपळलेल्या मराठवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील दुष्काळग्रस्त विद्यार्थी आर्थिक विवंचनेमुळे विद्यापीठाच्या परिसरातुन गावाकडे पलायन करत आहेत हे लक्षात आलयावर डॉ. नरेंद्र काळे यांनी विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. यातून त्यांची सामान्य जनतेबद्दलची संवेदनाच लक्षात येते.
राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेशाध्यक्ष या पदावर कामकरत असताना पश्चिम महाराष्ट्र व कोकण या भागात आलेल्या पूराच्या वेळी त्यांनी केलेले कार्य असेल किंवा कोविड काळातील वैद्यकीय मदत असेल किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केलेले समुपदेशन असेल त्यांच्या या कामाचे खुद्द आदरणीय शरद पवार साहेबांनी जाहीरपणे कौतुकही केले आहे. मांजरा नदीला पुर आला तेव्हा नदीकाठावरील नकसानग्रस्त कुटुंबीयांना मदत करण्यात ही डॉक्टर नरेंद्र काळे यांनी पुढाकार घेतला होता.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू केलेल्या लोकनेते 'श्री. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास संस्थेच्या सल्लागार मंडळाचे ते सदस्य असून त्या माध्यमातून त्यांनी शेती व अन्नप्रक्रिया उद्योग यासंदर्भातील कमी कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यातही पुढाकार घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षणाची सोय झाली आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसपासून त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघटनात्मक प्रवास सुरू झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल बीड जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष असा चढता प्रवास करत आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. एक शिस्तबद्ध कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या डॉ. नरेंद्र काळे यांनी नगर पालिका ते लोकसभा अशा सर्व प्रकारच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांसाठी निष्ठेने अहोरात्र कार्य केले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील अदृश्य शक्तीच्या दबावाखाली येत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी भाजपच्या नेतृत्वाखाली सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, पण डॉ. नरेंद्र काळे यांनी सत्तेपेक्षा विचार व तत्त्वांना प्राधान्य दिले. स्व. डॉ. बापूसाहेब काळदाते यांनी तत्त्वासाठी केंद्रीय मंत्रीपद नाकारले होते. हाच इतिहास कायमचा मनात साठवून सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचे अशी भूमिका घेत त्यांनी खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या सोबतच राहण्याचा ठाम निर्णय घेतला. सूक्ष्म नियोजन, कठोर परिश्रम हे गुण आणि व्यापक संपर्कक्षेत्र याच्या बळावर कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. प्रतिभावंत, रणनीतीकार, धोरणी, मुत्सद्दी व बहुमुखी प्रतिभेचे धनी असणाऱ्या डॉ. नरेंद्र काळे यांचे हे दखलपात्र विधायक कार्य समाजासाठी प्रेरक ठरत आहे.



